लेख
add tag
निरंजन
टेक्-लाईव्हच्या २०२० च्या वितरणातील पॉलिग्लॉसिया व मराठीविषयक बदल अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त असल्याने आपल्या संगणकावरील लाटेक् अद्ययावत करून घेणे अतिशय आवश्यक ठरते, परंतु अस्तित्वात असलेले टेक्-वितरण बदलणे तितकेसे सरळसोट मार्गाने करता येत नाही. लिनक्स आज्ञाप्रणालीच्या वापरकर्त्यांना लाटेक्-च्या स्थापनेबाबत सर्व सूचना एकत्रित मिळाव्यात ह्यासाठी हा लेख लिहावासा वाटतो.

	sudo apt-get upgrade texlive-full

ह्या आज्ञेसह टेक्-लाईव्हचे नवीनतम वितरण उतरवणे हा वास्तविक सगळ्यात सुरक्षित व चांगला मार्ग आहे, परंतु ह्यातली मुख्य अडचण अशी की लिनक्सच्या अनेक प्रणाल्यांमध्ये अजूनही टेक्-लाईव्हचे नवीनतम वितरण ॲप्ट-गेटसह उतरवता येत नाही आणि मग आणखी वेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यापेक्षा किंचित अधिक मेहनत लागेल असा एक मार्ग मी इथे सुचवेन. त्याकरिता [ह्या](https://www.tug.org/texlive/acquire-iso.html) दुव्यावरून टेक्-लाईव्हच्या नवीनतम आवृत्तीचा संपूर्ण आय-एस-ओ उतरवून घ्यावा.

त्या आय-एस-ओला सोडवून त्या फोल्डरमध्ये टर्मिनल उघडा व पुढील आज्ञा घाला.

	sudo ./install-tl
    
त्यानंतर `i` हा पर्याय देऊन त्याला टेक् स्थापित करू द्या.

तुमच्या टर्मिनल शेलप्रमाणे निरनिराळ्या rc धारिका तुमच्या संगणकावर असतात. उदा. बॅशचे टर्मिनल खूप लोकप्रिय आहे, जर तुम्ही ते वापरत असाल, तर तुमच्या home folder मध्ये .bashrc नावाची धारिका आढळेल. zsh shell वापरणाऱ्यांकडे .zshrc अशी धारिका आढळेल. त्या धारिकेतील शेवटच्या ओळीवर पुढील ओळी लिहा. ह्याशिवाय `.profile` नावाच्या धारिकेतदेखील पुढील पत्ते टाकून ठेवा.

```
export PATH=/usr/local/texlive/2020/bin/x86_64-linux:$PATH
export MANPATH=/usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/man:$MANPATH
export INFOPATH=/usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/info:$INFOPATH
```

ह्यामुळे तुमच्या टर्मिनलला सर्व आज्ञा नव्या टेक्-वितरणातून घ्यायच्या आहेत हे लक्षात येते व त्या आज्ञांचा पत्ता साठवून ठेवला जातो.

(२०२१ चे टेक्-वितरण बसवते वेळी ह्या पत्त्यातील २०२० चे २०२१ करणे विसरू नका :P)

---

आता समजा टेक्-चे आणखी एक वितरण तुमच्या संगणकावर असेल, तर दोन पत्ते तुमच्या संगणकावर असतात आणि अशा वेळी काही घोटाळे होण्याची शक्यता असते. हे तपासावे कसे? त्याकरिता पुढील आज्ञा वापरून तुम्ही नेमके कोणते टेक्-वितरण वापरत आहात हे तपासता येते.

	which xelatex
    
क्सेलाटेक्-ऐवजी इतर कोणतीही लाटेक्-अंतर्गत आज्ञा तुम्ही वापरू शकता. (उदा. लाटेक्, पीडीएफ्-लाटेक् ...) ह्या आज्ञेचे एकच फलित जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. जर दोन वेगवेगळी टेक्-वितरणे तुम्हाला दिसत असतील, तर त्यातले एक टेक्-वितरण काढणे आवश्यक आहे. त्याकरिता पुढील आज्ञा वापरा.

	sudo apt-get remove texlive-full

ह्या आज्ञेमुळे तुम्ही ॲप्टगेटच्या मदतीने स्थापित केलेले टेक्-लाईव्ह काढून टाकले जाईल व आपसुक नवे टेक्-लाईव्ह वापरले जाईल. जुन्या टेक्-वितरणाशी संबंधित सर्वच काढून टाकायचे असेल, तर पुढील आज्ञादेखील टाकू शकता, परंतु पुढील आज्ञा थोडी कठोर आहे, तिने सर्व dependencies काढल्या जातात, त्यामुळे ही आज्ञा चालवण्यापूर्वी नेमके काय काढले जातेय ह्याची खात्री करूनच ती चालवावी.

	sudo apt-get purge texlive-full
    
---    
एक आवश्यक सूचना
---

पॉलिग्लॉसिया आज्ञासंचातील `gloss-marathi.ldf` ह्या धारिकेत काही चुका झाल्या होत्या. त्या कालच बदलण्यात आल्या आहेत. कृपया `polyglossia` folder मधली `gloss-marathi.ldf` अद्ययावत करून घ्या. ह्यासाठी पुढील मार्ग आहेत.

* [ह्या](https://github.com/reutenauer/polyglossia/blob/master/tex/gloss-marathi.ldf) दुव्यावरील मजकूर तुमच्या संगणकावरील `gloss-marathi.ldf` मध्ये उतरवून बदल जतन करा.
* वर नमूद केलेली धारिका गिटहबवरून जशीच्या तशी उतरवून घेऊन तुमच्या टेक्-वितरणातील `gloss-marathi.ldf` ह्या धारिकेने बदलून टाका व ते झाल्यावर टर्मिनलवर पुढील आज्ञा द्या.

```
sudo texhash
```

Enter question or answer id or url (and optionally further answer ids/urls from the same question) from

Separate each id/url with a space. No need to list your own answers; they will be imported automatically.