सुशान्त
बिब-लाटेक् ह्या आज्ञासंचाचा वापर करण्यासाठी आपण जी बिब धारिका तयार करतो त्या धारिकेत अनेकदा विविध त्रुटी असतात. धारिका चालकासह चालवल्यानंतर त्या त्रुटी आपल्या लक्षात येतात. पण आपण बिब धारिका तयार करतानाच जर काळजी घेऊ शकलो तर आपल्याला नंतर निस्तरत बसावं लागणार नाही.
म्हणून चांगली बिब धारिका तयार करण्याची काही मार्गदर्शक तत्त्वं सांगता येतील का?
Top Answer
निरंजन
बिबलाटेक् हा आज्ञासंच अत्यंत मोठा आहे व त्यामुळे त्यात अनेक बाबींची काळजी घेणं आवश्यक ठरतं. मुळात हे संकेतस्थळ मराठीतून लाटेक्-च्या वापराबाबत असल्यामुळे मी मुख्यत्वे मराठीतून संदर्भलेखन करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर भर देईन. बिबलाटेक् आज्ञासंचाच्या ३.१७ ह्या आवृत्तीसह मराठीची सर्व भाषांतरं प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांनी ह्या आवृत्तीचाच वापर करावा अशी शिफारस करेन. पुढील उदाहरण पाहा. ह्यातील `filecontents` ह्या क्षेत्रातील आज्ञावली एक बिब धारिका आहे. पुढील tex धारिकेत `arara` ह्या स्वयंचालन-आज्ञावलीचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही नावासह ही धारिका तुमच्या संगणकावर नोंदवा व `arara`सह चालवा. ईप्सित फलित मिळेल. अन्यथा `xelatex`, `biber`, `xelatex` व `xelatex` ह्या क्रमाने आज्ञावली चालवा.
```
% arara: xelatex
% arara: biber
% arara: xelatex
% arara: xelatex
\documentclass{article}
\usepackage{marathi}
\usepackage[style=authoryear]{biblatex}
\addbibresource{\jobname.bib}
\begin{filecontents}[overwrite]{\jobname.bib}
@article{आलोकगौरी२०२१,
author = {मोघे, गौरी},
title = {तन्त्रशास्त्राचा परिचय},
journaltitle = {आलोक मराठी नियतकालिक},
pages = {४४-५८},
date = {२०२१-०१-२४},
series = {१},
note = {बुलढाणा: वर्णमुद्रा प्रकाशन}
}
\end{filecontents}
\begin{document}
\cite{आलोकगौरी२०२१}
\printbibliography
\end{document}
```
ह्याचं फलित पुढीलप्रमाणे:
![Screenshot_2022-02-04_23-57-27.png](/image?hash=844ef37d7e99f282a7ef36c5e7150011c8815c66365d48e2da3976d4f4f2c242)
ह्यातील नोंदनीय बाबी अशा की देवनागरी आकडे टाकूनही त्याचं संगणन अचूक होत आहे. उदा. `series={१}` ह्या ओळीचा अर्थ बिबलाटेक् व बिबर ह्यांना बरोबर कळतो व फलितात "१ला अंक" असं छापलं जातं; `date={२०२१-०१-२१}` असं लिहूनही फलितात "२४ जाने., २०२१" असं छापलं जातं. त्यामुळे संदर्भाची आज्ञावली लिहिताना देवनागरी आकडे सहज वापरता येतील. ते आवर्जून वापरावेत.
`date` ह्या नोंदीविषयी विशेष खबरदारी ही घ्यावी की वर्ष-महिना-दिवस ह्या क्रमात दिनांक लिहावी. महिना व दिवस लिहिताना कायम दोन आकडी लेखनच करावं (उदा. १ असल्यास ०१). दिनांकात वर्ष, महिना व दिवस ह्यांना वेगळं करण्यासाठी संयोगचिन्हाचाच वापर करावा. त्यामुळे दिलेल्या अंकांचं संगणन करण्यास मदत होते.